लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून बुधवारी मध्यरात्री कारने प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत अनमोल केवटे (वय ३3, रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले (वय ३२ रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर) ही गंभीर जखमी झाली आहे.
हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले. चाकू गळ्यात आरपार घातला तर सोनालीच्या छातीत तीन आणि पाठीवर दोन वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनमोलचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. सोनालीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल व सोनाली हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यानिमित्त लातूरला आले होते. परत सोलापूरकडे जात असताना या दोघांवर हल्ला झाला.
कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादावादीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला तर महिला पदाधिकारी सोनाली या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर १२:४५ वा. खाडगाव रोड, लातूर येथे घडली.
कारचा चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे (वय २८, खडकगल्ली, बाळे) याने लातूर येथील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये घटनेची फिर्याद दिली आहे. यातील मृत अनमोल आणि सोनाली हे बुधवारी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते. बैठकीनंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले. पाच नंबर चौक, खाडगाव रोडने औसाकडे येताना जीप (एम.एच.२६/ व्ही. २३५६) ओव्हरटेक करत असताना कट लागला. यावेळी चालकाने शिवी दिली. त्याला अनमोल यानेही दमबाजी केली. पुढे काही अंतरावर जाऊन जीप रस्त्यावर आडवी केली. अनमोल व सोनाली गाडीतून खाली उतरले. त्यावेळी बाचाबाचीनंतर दोघांत झटापट झाली.
दुसरा व्यक्ती गाडीतून उतरला आणि त्याने अनमोल यांच्या गळ्यात चाकू आरपार भोसकला. समोरून दोन वेळा गळ्यावर तर दोन वेळा पोटात चाकूने भोसकले. अनमोल जागेवरच कोसळले. तोपर्यंत सोनाली व दुसरा व्यक्ती एकमेकांचे केस धरून एकमेकांना मारत होते. चाकूने त्यांच्यावरही पाठीत, पोटात वार करण्यात आले. या प्रकरणी दोन अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि जिरगे अधिक तपास करीत आहेत.