गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर एक विशिष्ट प्रकारची पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये वापरकर्ते लिहित आहेत की, मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक, मेटाला कोणतीही परवानगी देत नाही. तसेच इतर मित्रांना हीच पोस्ट कॉपी-पेस्ट करून त्यांच्या वॉलवर टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या पोस्टमध्ये दावा आहे की, असे न केल्यास फेसबुकला कायदेशीर हक्क मिळून तो डेटा वापरू शकेल.
तथापि, फॅक्ट चेकनुसार हा दावा पूर्णपणे खोटा आहे. फेसबुक अकाउंट तयार करताना वापरकर्ते स्वतःच कंपनीच्या अटी-शर्ती मान्य करतात. यात कोणता डेटा गोळा केला जाईल आणि कसा वापरला जाईल, याची स्पष्ट माहिती दिलेली असते. फक्त कॉपी-पेस्ट केलेली पोस्ट टाकून या अटी बदलता येत नाहीत.
तज्ज्ञांचा सल्ला आहे की, अफवांवर आंधळा विश्वास न ठेवता, योग्य स्रोतांवरून तथ्य तपासावे आणि डिजिटल सुरक्षा जपण्यासाठी प्रत्यक्ष सेटिंग्जमध्ये बदल करावा.