क्राईम
चार वर्षाची चिमुरडी घराबाहेर खेळत होती

- सुप्रीम कोर्टाने काही क्षेत्र भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले आहेत. श्वानप्रेमींनी या निर्णयाचा विरोध करत न्यायालयाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. सोशल मीडिया आणि अन्य माध्यमात हा वाद सुरु असतानाच रसत्यांवरील चित्र बदललेले नाही. रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची दहशत आणि त्यांचे हल्ले सुरुच आहेत. नागपूरमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
- नागपुरातील वर्धमान नगर परिसरातील देशपांडे लेआऊट, त्रिमूर्ती नगर येथे रविवारी दुपारी भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका चार वर्षीय मुलीवर अचानक हल्ला केला. नित्या मोंगरी ही चिमुकली घराबाहेर खेळत असताना तीन ते चार भटके कुत्रे तिच्या मागे लागले आणि तिला चावा घेण्याचा प्रयत्न केला.
- कुत्र्यांनी नित्याला वेढा घालत चावा घेण्याचा प्रयत्न केल्याने ती जोरजोरात रडू लागली. तिच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे रहिवासी आणि दुकानदार तत्काळ धावून आले. स्थानिकांनी काठ्या आणि दगडांच्या सहाय्याने कुत्र्यांना हुसकावून लावले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
- या हल्ल्यात नित्याच्या पायाला आणि हाताला किरकोळ जखमा झाल्या असून तिला तात्काळ जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.



