क्राईम
चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग अनावर

- राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. आताही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीसोबत गैरवर्तन केल्याच्या रागातून पुतण्याने 35 वर्षीय तरुणाला ठार केल्याची घटना घडली आहे. चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याच्या रागातून पुतण्याने हॉकी स्टिकने खून केला. ही घटना काल रात्री सुमारे ११:३० वाजताच्या सुमारास पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वसाहत येथे घडली.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे नाव साईनाथ उर्फ ‘खलीबली’ दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर, पुणे) असे असून या प्रकरणी पोलीस कर्मचारी राहुल रामचंद्र गिरमे यांनी फिर्याद दिली आहे. आदित्य संतोष वाल्हेकर उर्फ सोन्या (वय २१, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) आणि समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २२, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार साईनाथ यांनी आरोपी आदित्यच्या चुलतीशी अयोग्य वर्तन करून तिला ‘आय लव्ह यू’ असे म्हटल्याची माहिती आदित्यला मिळाली. त्यामुळे संतापलेल्या आदित्यने आपला मित्र समर्थसोबत मिळून साईनाथला हाताने, लाथाबुक्यांनी आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केली. या मारहाणीत साईनाथ ठार झाला. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.



