छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका अन्यायानंतर एक महिला पुण्यात आश्रयासाठी आली होती. तिच्या मदतीसाठी पुढे आलेल्या तीन तरुणींनी तिला निवारा दिला. मात्र, याच महिलेसह त्या तिघींनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, चौकशी दरम्यान पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली आणि मानसिक त्रास दिला.
या घटनेनंतर तीनही तरुणींनी रविवारी सकाळपासून आज पहाटेपर्यंत पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले.
दरम्यान माध्यमांना बोलताना एका पीडितेने म्हटले की, पोलिस आमच्या घरात शिरले. ते आम्हाला नको नको ते बोलत होते. कोणत्याही प्रकारचे वॉरंट नसताना त्यांनी आमच्या घरात प्रवेश केला. फक्त बेडरुमच नाही तर ते आमच्या बाथरूममध्येही शिरले. पोलिसांनी आमच्या बाथरूममध्ये जाऊन चक्क आमच्या इनरवेअर तपासल्या. ते आम्हाला घाण घाण शिव्या देत होते. पूर्ण बेडरूम त्यांनी तपासली.
आम्ही त्यांना याबद्दल जाब विचारताच पोलिस स्टेशनला चला…आम्ही दाखवतो, असे म्हणत धमक्या दिल्या. पीडित तीन मुलींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, अजूनही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा गुन्हा हा दाखल करण्यात आला नाही.