सध्या सर्वत्र डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांपासून ते रस्त्यावर व्यवसाय करणारेही आता UPI पेमेंट स्वीकारू लागले आहेत. अशाच UPI व्यवहारांमधून एका भाजी विक्रेत्याची एकूण उलाढाल उघड झाली आहे.
किती कमाई झाली असावी याचा अंदाजही लावता येत नाही, कारण रेकॉर्ड खूपच मोठा आहे. कर्नाटकातील या भाजी विक्रेत्याला UPI व्यवहारांच्या आधारे थेट 29 लाख रुपयांची GST नोटीस बजावण्यात आली आहे.
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील एका छोट्याशा भाजी विक्रेत्याला तब्बल 29 लाख रुपयांची GST नोटीस प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. शंकरगौडा असे या विक्रेत्याचे नाव असू ते मागील चार वर्षांपासून म्युनिसिपल हायस्कूलजवळील मैदानासमोर भाजीपाला विक्रीचे छोटे दुकान चालवत आहेत. डिजिटल व्यवहारामुळे कधी तरी अडचण निर्माण होईल, अशी कल्पनाही शंकरगौडांना नव्हती. पण आज तीच गोष्ट त्यांच्या अडचणीचे मुख्य कारण ठरली आहे.
शंकरगौडा सांगतात की, ते ताज्या भाज्या थेट शेतकऱ्यांकडून घेऊन आपल्या हातगाडीतून विक्री करतात. आजकाल ग्राहकांकडे रोख रक्कम नसल्यामुळे बहुतेक वेळा यूपीआय किंवा इतर डिजिटल पद्धतीनेच पैसे दिले जातात. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, ते दरवर्षी आयकर विवरणपत्र भरतात आणि आपल्या सर्व व्यवहारांची नोंद नियमितपणे ठेवतात. मी दरवर्षी आयटी रिटर्न भरतो. माझ्याकडे सगळ्या व्यवहारांची माहिती आहे, असे त्यांनी म्हटले.
त्यांच्यावर जीएसटी विभागाने 1.63 कोटी रुपयांच्या डिजिटल व्यवहारांच्या आधारे 29 लाख रुपयांचा कर भरण्याची मागणी केली आहे. मात्र शंकरगौडा म्हणतात, इतकी मोठी रक्कम मी कशी भरू शकतो?.