सोशल मीडियावरील ऑनलाईन अश्लील साईट्सविरोधात केंद्र सरकारने कडक कारवाई केली आहे. केंद्र सरकारने ULLU, ALTT, Desiflix Big Shots सारख्या 25 सॉफ्ट पॉर्न ॲप्सवर बंदी घातली आहे.
सॉफ्ट पॉर्न ॲप्सवर सरकारने आतापर्यंत केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईंपैकी ही एक आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. सरकारने या निर्णयाबाबत इंटरनेट सेवा प्रदात्याला विशेष सूचना देखील जारी केल्या आहेत.
यासंदर्भात, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 अंतर्गत, मध्यस्थ बेकायदेशीर माहिती काढून टाकण्यास किंवा प्रवेश अक्षम करण्यास जबाबदार आहेत. या अधिसूचनेत असे म्हटले आहे की लैंगिकदृष्ट्या स्पष्ट आणि भारतीय कायदेशीर आणि सांस्कृतिक मानकांचे उल्लंघन करणारी सामग्री प्रसारित करण्यास आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
बंदी घातलेल्या अॅप्समध्ये बिग शॉट्स अॅप, बूमएक्स, नवरासा लाईट, गुलाब अॅप, कंगन अॅप, बुल अॅप, जलवा अॅप, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट, हिटप्राइम, फेनिओ, शोएक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉटएक्स व्हीआयपी, हलचल अॅप, मूडएक्स, निऑनएक्स व्हीआयपी, फुगी, मोजफ्लिक्स, ट्रायफ्लिक्स यांचा समावेश आहे.