दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक असलेल्या कोटा श्रीनिवास राव यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे आज पहाटे निधन झाले. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या तीन दिवसांनी त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करून अभिनेत्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे.
दिवंगत अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते खूप कमकुवत दिसत होते. त्यांची प्रकृती पाहून त्यांचे चाहते खूप चिंतेत पडले होते. या चित्रात दिवंगत अभिनेत्याच्या एका पायावर पट्टी बांधलेली होती. दुसऱ्या पायावरही जखमांच्या खुणा होत्या. यावरून त्यांची आजारी प्रकृती दिसून येत होती. राव हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव होते. त्यांनी 1978 मध्ये ‘प्रणम खारीदू’ या चित्रपटातून पदार्पण केले. 40 वर्षांहून अधिक काळाच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
विविध चित्रपटांमध्ये खलनायक, सहाय्यक अभिनेता आणि विनोदी कलाकाराच्या भूमिका साकारल्याबद्दल त्यांना 9 वेळा नंदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2015 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यांचे प्रमुख चित्रपट ‘दम्मू’, ‘सन ऑफ सत्यमूर्ती’ आणि ‘डेंजरस खिलाडी’ हे होते. तेलुगू व्यतिरिक्त राव यांनी तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये अनेक चित्रपट केले होते. राव यांनी राजकारणातही काम केले. 1999 ते 2004 पर्यंत ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा पूर्वचे आमदार होते.