- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. अशा स्थितीत महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
- यातच दोन मोठ्या राजकीय घडामोडींनी राज्याच्या भविष्यातील राजकारणाची दिशा बदलण्याचे मोठे संकेत दिले आहेत.
- मुंबईत काल पार पडलेल्या विजयी मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- एकीकडे ठाकरे बंधूंच्या भेटीची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक वेगळीच राजकीय खेळी खेळली आहे. त्यांनी ‘एक नवी सुरुवात करतोय…’ असे ट्विट करत ‘महाराष्ट्रधर्म’ नावाची नवी पॉडकास्ट मालिका सुरू करण्याची घोषणा केली आहे. काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी आषाढी एकादशीपेक्षा दुसरा कोणता पवित्र दिवस असेल? असे म्हणत त्यांनी आज सकाळी 11 वाजता त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या पॉडकास्टचा पहिला भाग प्रसिद्ध होणार असल्याचे जाहीर केले आहे.
- पहिल्या पॉडकास्टमध्ये फडणवीस यांनी महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असलेल्या ‘वारी’बद्दल माहिती दिली आहे. शिवाजी महाराजांच्या काळापासून ते अगदी इंग्रजांच्या राजवटीतही वारी कशाप्रकारे अविरत सुरू राहिली, याचे महत्त्व त्यांनी सोप्या भाषेत सांगितले आहे.
- ‘महाराष्ट्र धर्म’ ही या पॉडकास्टची मुख्य संकल्पना असल्याने भविष्यात या पॉडकास्टमधून महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि राज्याच्या विकासाचे विविध पैलू मांडले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तोंडावर मतदारांशी थेट, भावनिक संवाद साधण्याचा आणि तरुण पिढीला आकर्षित करण्याचा हा फडणवीस यांचा प्रयत्न मानला जात आहे.
ब्रेकिंग! एक नवी सुरुवात करतोय…
