वाहनांवर एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे आता आवश्यक करण्यात आले आहे. मात्र, अनेक जुन्या वाहनधारकांनी अद्याप ही प्लेट बसवलेली नाही.
सध्या केवळ 8 टक्के वाहनधारकांनीच या नियमाची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे आता जुन्या वाहनांची खरेदी किंवा विक्री करताना एचएसआरपी प्लेट नसेल तर अशा वाहनांचा ट्रान्स्फर न करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम क्रमांक 50 नुसार सर्व वाहनांवर एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या नव्या वाहनांनाही ही प्लेट लावणे आवश्यक आहे. जर वाहनावर ही उच्च सुरक्षा प्लेट नसेल तर संबंधित वाहनमालकांना आरटीओशी संबंधित कामकाज करताना अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.
शासनाने एचएसआरपी लावण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली आहे.
ही संधी शेवटची असल्याने सर्व वाहनमालकांनी लवकरात लवकर आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा नियमभंग केल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.