इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. काल रात्री उशिरा ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर ही घोषणा केली.
सर्वांचे अभिनंदन! इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण आणि अंतिम युद्धबंदी झाली आहे, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले. तसेच ही युद्धबंदी पुढील सहा तासांत लागू होणार असून सुरुवात इराणकडून होईल.
पण इस्रायल सरकारकडून मात्र या युद्धबंदीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. दरम्यान, इस्रायलच्या सैन्याने आज आपल्या नागरिकांना सावध केले की, इराणकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. यासोबतच जेरुसलेम आणि तेल अवीवमध्येही स्फोटांचे आवाज ऐकले गेले आहेत. याशिवाय इराणी क्षेपणास्त्राने बीरशेबा येथील इमारतीवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान तीन लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक इस्रायली जखमी झाले आहेत. हा हल्ला अशावेळी झाला, जेव्हा इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध थांबवण्याबाबतच्या चर्चेचे वातावरण तयार होत होते. पण या ताज्या हल्ल्याने दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढवला आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने सांगितले की, इराणकडून क्षेपणास्त्रे डागल्यामुळे देशभर सायरन वाजू लागले. हा हल्ला इराणी वेळेनुसार पहाटे चार वाजल्यानंतर झाला. यापूर्वी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले होते की, जर इस्रायलने आपले हवाई हल्ले थांबवले, तर इराणही युद्ध थांबवेल.