- आकाशात उडायचे हे रोशनीचे बालपणीचे स्वप्न होते, तेच तिच्यासाठी जीवघेणे ठरले. तिच्या या स्वप्नाला आकाशाचीच नजर लागली. डोंबिवलीच्या हवाई सुंदरीचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाला. 27 वर्षीय रोशनीला आकाश खूप आवडायचे. फ्लाईट अटेंडंट ही फक्त तिच्यासाठी एक नोकरी नव्हती, तर तिचे प्रेम होते. तिला आकाश खूप आवडायचे अन् आकाशही तिच्यावर खूप प्रेम करायचे. रोशनी जेव्हा फ्लाईटने कुठे जायची, तेव्हा ती त्याबद्दल तिच्या इंस्टाग्रामवर माहिती शेअर करायची. रोशनीचे ‘स्काय लव्हज हर’ या इंस्टाग्राम अकाउंटवर 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
- महाराष्ट्रातील डोंबिवली येथील रहिवासी रोशनी लहानपणापासूनच एअर होस्टेस बनू इच्छित होती. त्यासाठी तिने खूप कष्ट केले. तिचा प्रवास 10 बाय 10 च्या खोलीपासून सुरू झाला आणि एअर इंडियाचे केबिन क्रूपर्यंत जावून थांबला. रोशनीच्या वडिलांनी लेकीच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी कोणतीच कसर सोडली नव्हती. दोन वर्षांपूर्वी रोशनी एअर होस्टेस बनली आणि स्पाइसजेटमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर, ती एअर इंडियामध्ये रुजू झाली.
- अहमदाबाद विमान अपघाताच्या दोन दिवस आधी रोशनी गावी आली होती. ती तिच्या आजी-आजोबा, काका-काकूंना भेटली होती. तिने गावातील मंदिरात कुलदेवतेचे दर्शनही घेतले होते. त्यानंतर, घरी येताच ती पुन्हा कामावर परतली अन् तिने काल लंडनला जाणारे विमान पकडले.
- अहमदाबाद अपघातात भाची गमावलेल्या काकांनी सांगितले की, त्यांनी रोशनीच्या आईला अद्याप काहीही सांगितले नाही, कारण तिला बीपीचा त्रास आहे. तिचा धाकटा भाऊ सध्या जहाजावर आहे, तो नौदलात तैनात आहे.
- अशा परिस्थितीत फक्त मोठा भाऊ आणि वडील रोशनीचा मृतदेह घेण्यासाठी अहमदाबादला गेले आहेत. रोशनीच्या वडिलांनी सांगितले की, एअर इंडियाचे काही सहकारी त्यांच्या कुटुंबासह अहमदाबादमध्ये आहेत.
बॉलिवूड हिरोईनलाही लाजवेल असे सौंदर्य
