- एअर इंडियाचे प्रवासी घेऊन लंडनला निघालेले विमान अचानक कोसळले. या अपघातात तब्बल 241 प्रवासी ठार झाले. मात्र या अपघातात अकोल्यााची ऐश्वर्या तोष्णीवाल मात्र थोडक्यात बचावली. मेघाणीमध्ये ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर विमान कोसळले, त्या कॉलेजात ऐश्वर्या द्वितीय वर्षात शिकत आहे. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा ऐश्वर्या होस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. त्याचवेळी अचानक कशाचा तरी मोठा आवाज झाला आणि सगळीकडे धुरच धूर दिसू लागला. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला होता. काय झाले तेच काही कळत नव्हते. अशाही परिस्थितीत ऐश्वर्याने न घाबरता धुराच्या लोटांतून वाट काढत स्वतःचा जीव वाचवला.
- ऐश्वर्या सध्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. घटना घडण्याच्या एक दिवस आधीच ती आजोबांचा वाढदिवस साजरा करून परतली होती. ज्यावेळी हा अपघात घडला, तेव्ही ती झोपेत होती. परंतु, मोठ्या आवाजाने तिला जाग आली. डोळे उघडून पाहिले तर सगळीकडे धुरच धूर दिसत होता. परिस्थिती पाहून तिने स्वतःला एका चादरीत गुंडाळून घेतले. धुराच्या लोटातून वाट काढत पाचव्या मजल्यावरून खाली उतरत जीव वाचवला. या धावपळीत तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याच्या खुणा आल्या.
- या घटनेनंतर ऐश्वर्या प्रचंड घाबरली होती. तशाच स्थितीत तिने वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन केला. त्यांना देखील भीती वाटली. त्यांनी दुकान बंद केले आणि घर गाठले. टिव्ही सुरू केला. टिव्हीवर याच बातम्या सुरू होत्या. देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या अपघातातून वाचली, अशी प्रतिक्रिया वडिलांनी दिली आहे.
आगीतून थरारक सुटका! अकोल्याच्या ऐश्वर्याने चादरीत गुंडाळून वाचवला जीव
