मुख्यमंत्रिपदासाठी एखादा नवा चेहराही शक्य?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना निवडणुकीला सामोरे जात आहेत. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत या मुद्द्यावर जास्त धुसफूस दिसून येत होती. परंतु, काँग्रेस आणि शरद पवार गटाने उद्धव ठाकरेंच्या मागणीला महत्व न दिल्याने हा मुद्दा मागे पडला होता.
मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य केले होते. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या मुद्द्यावर निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेऊ असे सांगितले होते. दरम्यान आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत या मुद्द्यावर भाष्य केले आहे.
पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, अशी भावना असणे साहजिकच आहे. मात्र वस्तुस्थिती देखील पाहणे गरजेचे असते. महायुतीचे राजकारण वास्तविकतेवर आधारीत आहे. तेव्हा मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत आमच्यात नाही आणि अशा शर्यतीत मी अजिबात सहभागी नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आले. त्यावेळीसुद्धा भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. शिंदे यांनी मुख्यमंत्री करा, अशी कोणतीही अट ठेवलेली नव्हती. मात्र एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू हे आम्हीसुद्धा दाखवून दिले. आम्हाला सत्तेची कोणतीही लालसा नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.



