क्राईम
श्रद्धा प्रकरण ताजे असताना मुंबई पुन्हा हादरली

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशाला हादरवून टाकले असताना, मुंबईतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील बोरिवली भागात एका प्रियकारने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पीडित प्रेयसीच्या वडिलांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. अमेय दरेकर असे आरोपी प्रियकराचे नाव असून तो बोरिवली परिसरातील रहिवासी आहे.
आरोपी अमेय आणि पीडित तरुणी एकमेकांना सुमारे दहा वर्षांपासून ओळखत असून त्यांचे प्रेमसंबंध आहेत. पीडित प्रेयसी अमेय याला भेटण्यासाठी रविवारी रात्री बोरिवली येथील त्याच्या निवासस्थानी गेली. यावेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादानंतर संतापलेल्या आरोपीने पीडित प्रियसीला इमारतीच्या पाण्याच्या टाकीवरून धक्का देत ढकलून दिले. यामुळे अंदाजे 18 फूट खाली पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेवेळी दोघांनीही मद्यपान केले होते. पीडित प्रेयसीच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. अशा अवस्थेतही दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी अमेय आणि त्याच्या आईने पीडित प्रेयसीला तिच्या आई- वडिलांकडे नेऊन सोडले. यानंतर पीडित प्रेयसीच्या वडिलांनी याप्रकरणी आरोपी प्रियकरावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.