महाराष्ट्र
ब्रेकिंग! महिलांच्या नावाच्या नियमांमध्ये बदल?

- महिलांनी स्वतःचे नाव कसे लिहावे, यासंदर्भात महाराष्ट्र सरकार लवकरच नवा शासन निर्णय काढण्याच्या तयारीत आहे. 2024 पासून शासकीय कागदपत्रांमध्ये नावासोबत आईचे नाव बंधनकारक करण्यात आले. मात्र, महिलांना त्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे नाव लिहिताना अधिक स्पष्टता मिळावी, अशी मागणी आमदार सना मलिक यांनी विधानसभेत केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लवकरच शासन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे.
- आत्तापर्यंत महिलांनी आपल्या नावासोबत आधी वडिलांचे नाव आणि त्यानंतर आडनाव लिहिण्याची पद्धत होती. लग्नानंतर काही जणींनी पतीचे नाव लावले, तर काहींनी केवळ आडनाव बदलले. मात्र, सरकारने 2024 मध्ये नवीन नियम लागू करत महिलांना त्यांच्या नावानंतर आईचे नाव लिहिणे बंधनकारक केले. त्यामुळे अनेक महिलांना आपल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये नाव कसे लिहावे, याचा प्रश्न निर्माण झाला.
- आमदार सना मलिक यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडताना स्वतःचा अनुभव सांगितला. मी आधी वडिलांचे नाव लावत होते, नंतर लग्नानंतर पतीचे नाव आले. आता मध्येच आईचे नाव लिहावे लागत आहे, त्यामुळे नावात नेमके काय ठेवायचे?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
- उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी विधानसभेत सांगितले की, सरकार लवकरच या संदर्भात स्पष्ट शासन निर्णय काढणार आहे. यामुळे महिलांना त्यांच्या नावासोबत कोणते नाव लावायचे याबाबत पर्याय मिळण्याची शक्यता आहे. सरकार कडून नाव लिहिण्याच्या प्रक्रियेत शिथिलता देऊन महिलांना लग्नानंतरचे किंवा लग्नाआधीचे नाव निवडण्याचा पर्याय दिला जाईल.