विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून लाडकी बहीण योजना तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक महायुती सरकारवर चारही बाजूने टीका करताना दिसत आहे. त्यामुळे महायुती सरकार बॅकफूटवर जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.
नुकतेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून शिंदे आणि त्यानंतर अजितदादा पवारांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती. तर आता या विधानावरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे आणि अजितदादा यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अजितदादा आणि शिंदे यांची अवस्था फार वाईट आहे. पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहिती नाही. भाजप त्यांना जगू देत नाही. शिंदे यांची अवस्था फार वाईट झाली आहे. त्यांच्या सगळ्या योजना बंद करण्यात येत आहेत. त्यांच्या लोकांची सुरक्षा काढली गेली, पण भाजपच्या लोकांची सुरक्षा आहे. त्यामुळे त्यातून त्यांनी शिकावे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
त्यांनी आमच्यासोबत यावे. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्ही त्यांची काळजी घेऊ. त्यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी ओढ लागली आहे. आम्ही दोघांनाही काही दिवस मुख्यमंत्री बनवू. अजितदादा यांना काही दिवस आणि एकनाथ शिंदे यांना काही दिवस मुख्यमंत्री बनवू, असे पटोले म्हणाले.