महाराष्ट्र परिवहन विभागाने एक मानक कार्यप्रणाली जारी केली, या अंतर्गत सगळ्या बाईक आणि कारला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी गाडी मालकांना मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती जी आता एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात येत आहे. जर तोपर्यंत ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावले गेले नाही तर नियमांनुसार दंड आकारला जाईल.
दरम्यान सोलापूर शहरात वाहतूक शाखेकडून वाहनधारकांची तपासणी केली जात आहे. हाय सिक्युरिटी ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, जी चोरी, गैरवापर आणि बनावट नंबर प्लेट्स रोखण्यासाठी सरकारने अनिवार्य केली आहे. या प्लेटमध्ये एक खास क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-कोड आणि स्थायिक क्रमांक असतो, जो डुप्लिकेट नंबर प्लेट तयार होण्यापासून वाचवतो.
सरकारच्या नियमानुसार, ज्या गाड्या एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत, त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. जर तुमच्या गाडीची नोंदणी एक एप्रिल 2019 नंतरची असेल, तर तुमच्या गाडीत आधीच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असेल. त्यामुळे तुम्हाला नवीन नंबर प्लेट घेण्याची गरज नाही.