छगन भुजबळ अचानक चर्चेत आले!

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडणार आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले भुजबळ अखेर मंत्रिमंडळात दाखल होणार आहेत.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाची वाट पाहून असलेले भुजबळ यांना जेव्हा डावलले गेले, त्यानंतर आपली नाराजी अनेकवेळा बोलून देखील दाखवली होती. ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून भुजबळांकडे पाहिले जाते. त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर ओबीसी समाजाकडून मोठी नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता भुजबळ हे आज मंत्रिपदाची शपथ घेतील.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच धनंजय मुंडे यांचे अन्न व नागरी पुरवठा खाते भुजबळ यांना मिळण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप झाले. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांचे खाते आता भुजबळांकडे जाणार असल्याचे दिसते.