पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर, त्यानंतर जवळपास तीन दिवस पाकिस्तान सोबत निर्माण झालेली युद्धसदृश परिस्थिती आणि त्यानंतर शस्त्रसंधीची घोषणा याबाबत देशवासीयांना काय वाटते, याचा नुकत्याच एका सर्वेक्षणातून आढावा घेण्यात आला. पाकिस्तान विरोधात मोदी सरकारने केलेल्या कारवाईबाबत देशातील नागरिक किती समाधानी आहेत, तर कितीजणांना शस्त्रसंधीचा निर्णय पटलेला नाही, याच मुद्द्यांच्या आधारे सी – व्होटर्सने हे सर्वेक्षण केले.
सी व्होटरने केलेल्या या सर्व्हेतून समोर आलेले निष्कर्ष आश्चर्यजनक आहेत. टेलिफोनच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. सरकारने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या या ऑपरेशन सिंदूरबाबत तुम्ही समाधानी आहात का, असे विचारले असता 68.1 टक्के लोकांनी आपण समाधानी असल्याचे सांगितले. तर 5.3 टक्के लोक या कारवाईमुळे आपण संतुष्ट नसल्याचे म्हटले आहे. 15.3 टक्के आपले काहीच मत मांडू शकले नाहीत.
युद्धसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाही अचानक शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, या सर्वेक्षणात या प्रश्नावर नागरिकांची फारशी नाराजी दिसली नाही. 63.3 टक्के लोकांनी शस्त्रसंधीचे स्वागत केले. तर याच्या विरोधात 10.2 टक्के लोकांनी आपले मत नोंदवले आहे. 17.3 टक्के नागरिकांनी कोणतेही मत नोंदवले नाही.