- पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला. त्यानंतर भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर उभय देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, भारताने नाकीनऊ आणल्यानंतर पाकिस्तानने पांढरे निशाण फडकावले. परिणामी, उभय देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. मात्र, याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी दिल्याने विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे.
- भारताने वारंवार नकार दिल्यानंतरही ट्रम्प यांची या प्रकरणीत ढवळाढवळ सुरूच आहे. आता सौदी अरेबियात भाषण करताना त्यांनी, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षविरामाचे श्रेय घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न तर केलाच, पण त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान हे एकत्र डिनर करण्यासाठी गेले तर तणाव आणखी कमी होईल, असे म्हटले आहे. सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या उपस्थितीत झालेल्या यूएस-सौदी गुंतवणूक मंचाला ट्रम्प संबोधित करत होते. दोन अण्वस्त्रधारी शेजारी राष्ट्रांमधील संभाव्य अणुयुद्ध टाळण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. काही दिवसांपूर्वीच माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक शस्त्रसंधी केली. यामध्ये आम्ही व्यापाराचा वापर शस्त्र म्हणून केला. मी दोन्ही देशांना म्हणालो – मित्रांनो, चला काहीतरी व्यापार करूया. अण्वस्त्रांचा नव्हे, तर तुम्ही अतिशय कौशल्याने बनवलेल्या वस्तूंचा. दोन्ही देशांमध्ये खूप ताकदवान आणि समजूतदार नेते आहेत. त्यामुळेच हे सर्व थांबले. आशा आहे की अशीच स्थिती राहील.
- दरम्यान भारत सरकारने ट्रम्प यांचे दावे कायम फेटाळलेच आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक यांच्यातील परस्पर चर्चेतून शस्त्रसंधी करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती, असे परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
ट्रम्प तात्याचा आगाऊपणा सुरूच
