भारत आणि पाकिस्तानमध्ये जरी युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला असला तरी दोन्ही देशांच्या तणाव परिस्थितीत तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला. भारताविरोधात सरळ पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानला आता पुणेकरांनी मोठा आर्थिक दणका देत तीन महिन्यात होणारी 1200 ते 1500 कोटींच्या तुर्की सफरचंदांच्या उलाढालीला ब्रेक लावला आहे. पुणेकर व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे आर्थिक कोंडी होऊन तुर्कस्तानला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
पुण्यातील एपीएमसी मार्केटमधील सफरचंद व्यापारी सुयोग झेंडे यांनी याबाबत सांगितले की, भारतासोबतच्या अलिकडच्या तणावात तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर आता आम्ही सर्व पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्कस्तानने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यानंतर अनेक ग्राहक हिमाचल आणि इतर भागातील सफरचंद खरेदी करणे पसंत करत असल्याचे झेंडे म्हणाले. हा निर्णय देशप्रेमासाठी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यात तुर्की सफरचंद तीन महिने विकले जातात. याची तीन महिन्यातील साधारण उलाढाल ही सुमारे 1200 ते 15000 कोटींची आहे. पण, तणावाच्या परिस्थितीत तुर्कस्तानने भारताविरोधात उभे राहत पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्यांची ही भूमिका पटणारी नसून देशभक्ती म्हणून लोकांनी बॅन तुर्की हा ट्रेंड चालवला आणि लोक डायरेक्ट सफरचंद खरेदीला विरोध करीत आहेत. त्यानंतर आम्हीदेखील तुर्की सफरचंद खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला असून तुर्कीमध्ये जेव्हा भूकंप झाला. तेव्हा त्यांना मदत करणारा पहिला देश भारत होता. परंतु त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचेही झेंडे म्हणाले.