ब्रेकिंग! कर्नल सोफिया कुरेशींच्या घरावर हल्ला झाल्याची अफवा

Admin
2 Min Read
  • ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. यानंतर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याचे शौर्य जगासमोर मांडले. भारतीय सैन्य पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा कसा नायनाट करत आहे याची माहिती दिली.
  • त्यामुळे सोशल मीडियावर या दोन महिला अधिकाऱ्यांची सध्या चांगलीच चर्चा होत आहे आणि प्रत्येक भारतीयांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. अशातच कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बेळगावमधील घरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लोकांनी हल्ला केल्याची अफवा सोशल मीडियावर उठविण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांनी ट्विटर पोस्टची दखल घेतली असून सदर पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.
  • ऑपरेशन सिंदूरनंतर कर्नल सोफिया कुरेशी यांच्याशी संबंधित सायबर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आज अनिस उद्दीन आणि @JN_Araain या दोन ट्विटर अकाऊंटवरून सोफिया कुरेश यांच्यावर हल्ला झाल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. अनिस उद्दीन या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या खोट्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कर्नल सोफिया कुरेशी आणि त्यांच्या मुलावर हल्ला झाला असून त्यांच्या घराला आग लावण्यात आली आहे. याशिवाय सोफिया यांच्या घराबाहेर मुस्लीम समाजाविरोधात द्वेषपूर्ण घोषणा दिल्या गेल्याचा दावाही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, सदर अकाऊंटचे लोकेशन कॅनडामधील ब्रिटिश कोलम्बिया येथील आहे.
  • @JN_Araain या ट्विटर अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आरएसएसने पुन्हा एकदा द्वेष पसरविला आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांना लक्ष्य करण्यात आले असून त्यांच्या बेळगावमधील घरावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे. आरएसएसच्या हल्ल्यात मुलगा समीर गंभीर जखमी झाला असून त्यांचे घरही पेटवून देण्यात आले आहे. त्यामुळे कुरेशी यांचे कुटुंब सध्या दिल्लीत लष्कराच्या संरक्षणाखाली आहे.
  • दरम्यान बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद यांनी अशा प्रकारची घटनाच घडली नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, सदर पोस्ट खोटी असून केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक एसएन श्रुती यांनीही ही पोस्ट खोटी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, सदर पोस्ट ज्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे, त्याचे वापरकर्ते परदेशातील आहेत. आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याप्रकरणी आम्ही पुढील तपास करत असून सध्या सोफिया यांच्या कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
Share This Article