पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई करत हवाई हल्ले केले होते. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरात हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र भारताने आपल्या एअर डिफेन्स सिस्टमच्या मदतीने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले.
तर दुसरीकडे आता दोन्ही देशात वाढलेला तणाव कमी होताना दिसत आहे. दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी दोन्ही देशांचे डीजीएमओने चर्चा केली आहे. यानंतर भारताच्या तिन्ही सैन्याच्या डीजीएमओंची पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय डीजीएमओंकडून विराट कोहली आणि अॅशेस मालिकेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देताना विराट आणि अॅशेस मालिकेचा उल्लेख केला आहे. भारताची डिफेन्स ताकद स्पष्ट करण्यासाठी डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी 1970 च्या दशकातील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु असणारी अॅशेस मालिकेतील उदाहरण दिले.
घई म्हणाले की, आज विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसारखा तो माझा पण आवडता खेळाडू आहे. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका सुरु होती आणि या मालिकेत दोन ऑस्ट्रेलियन फास्ट गोलंदाज जेफ थॉमसन आणि डेनिस लिली इंग्लंड फलंदाजाना खूप त्रास देत होते. त्यामुळे त्या काळात एक म्हण प्रसिद्ध झाली होती. अॅशेस ते अॅशेस, जर थॉमोने तुम्हाला पकडले नाही तर लिली तुम्हाला पकडेल. असे उदाहरण देत लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, जरी शत्रू भारताच्या एका थरातून पळून गेला तरी पुढचा ग्रिड त्याला रोखेल. भारताचे संरक्षण कवच अभेद्य आहे आणि ते तोडणे हे फक्त एक स्वप्न आहे.