- भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. चार दिवस चाललेल्या लष्करी कारवाईत भारताने पाकिस्तानला गुडघ्यावर आणले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने सरकारच्या या लष्करी कारवाईचे कौतुक केले आहे. विरोधी पक्षांनीही मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधी घोषणेवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी केली आहे. जेणेकरून भारतीय लष्कराने पाकिस्तानला किती खोलवर जखम दिली आहे, हे देशातील जनतेला समजू शकेल.
- राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, विरोधी पक्षांनी एकमताने केलेल्या विनंतीचा मी पुनरुच्चार करतो की, संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावे. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीवर चर्चा करणे लोकांसाठी आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी खूप महत्त्वाचे आहे. शस्त्रसंधीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती. येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या या मागणीचा गांभीर्याने आणि तत्परतेने विचार कराल, असे राहुल यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता विशेष अधिवेशनाबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युद्धबंदीनंतर राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी
