महाराष्ट्र
ब्रेकिंग! राज्यात मराठा समाज पुन्हा आक्रमक

मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाचा आज 8 वा दिवस आहे. जरांगे यांच्या आंदाेलनाला लातूर येथील सकल मराठा समाजाने पाठिंबा देत शुक्रवारपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदाेलन केले.
दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव लातूर जिल्ह्यातून बाहेरगावी जाणा-या एसटी बसच्या फे-या सलग दुस-या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात तसेच तालुक्यात धावणाऱ्या बस रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. दुसरकीडे खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र आहे.
लातूर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर, बीड ,धाराशिव, परभणी, नांदेड या मार्गावरील बसच्या फेऱ्या आजही पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनाच्या मदतीने प्रवास करावा लागत आहे.
काल एसटीच्या फे-या रद्द झाल्याने लातूर विभागाचे 11 लाख 28 हजार 768 रुपये इतके नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली.
पुणे मार्गावर वाखरी येथे मराठा समाजबांधवांनी सुमारे तासभर रास्तारोको आंदोलन केले आहे. आंदोलनामुळे पुणे आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर गोपाळपूर येथे मराठा समाजबांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
तसेच शेगाव दुमाला व परिसरातील मराठा समाजाने पंढरपूर- सोलापूर महामार्ग रोखून धरला. पंढरपूर -टेंभूर्णी या मार्गावर देखील आंदोलन करण्यात आले. पंढरपूर शहराकडे येणाऱ्या सहा प्रमुख मार्गावर मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.
एकाच वेळी प्रमुख महामार्गावर रास्तारोको तसेच चक्काचाम आंदोलन सुरू असल्यामुळे प्रवाशांबरोबरच माघी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची तारांबळ उडाली.