राज्यातील विविध भागांमध्ये खुनाचे प्रकार अलीकडे वाढले आहे. बीडच्या अंबाजोगाईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका भाच्याची हत्या करण्यात आली आहे. राजेंद्र श्रीराम कळसे (वय 37) असे मृत भाच्याचे नाव आहे. राजेंद्रच्या पाच मांमानी मिळूनच त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी शहर पोलीसात पाचही मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर चौघांचा शोध सुरु आहे.
राजेंद्र यांच्या पत्नी आशा कळसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत राजेंद्र यांची आई अंबाजोगाई येथील आहे. राजेंद्र यांच्या आईला पाच भाऊ आहेत. राम माणिकराव लाड, लक्ष्मण माणिकराव लाड, भरत माणिकराव लाड, बजरंग माणिकराव लाड, शत्रुघ्न माणिकराव लाड अशी या पाच भावांची नावे आहेत.
मृत राजेंद्रचा शिवाजी चौकाच्या अलीकडे मेन रोडला वडिलोपार्जित प्लॉट आहे. या जागेवर बजरंगचे ज्युस बारचे दुकान, रामचे पंक्चरचे दुकान, भरतचे वेल्डींगचे दुकान, शत्रुघ्नचे पंक्चरचे दुकान अशी मिळून चौघांची दुकाने आहेत. तर लक्ष्मणला दुकानासाठी जागा न देता त्या बदल्यात त्याला पाठीमागे असलेली घराची जागा देण्यात आली होती. तो त्याच्या कुटुंबासह राहतो. याच वडिलोपार्जित जागेचा हिस्सा मिळावा, यासाठी राजेंद्र गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होता. याच मुद्यावरून राजेंद्रचे त्याच्या मामासोबत वर्षभरापूर्वी वादविवाद होऊन भांडणेदेखील झाली होती.
दरम्यान घटनेच्या दिवशी शुक्रवारी राजेंद्र त्याच्या बाईकवरून बाहेर जाऊन येतो, म्हणून घराबाहेर पडला होता. दरम्यान यावेळी त्याचा पाच मामांसोबत जागेवरून पुन्हा वाद झाला. याच वादातून पाच मामांनी मिळून राजेंद्रच्या डोक्यात दगडाने मारून त्याची हत्या केली.
या प्रकरणी पाचही आरोपी मामाविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.