पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून 27 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार महोम्मतराल येथील आसिफ शेख याचे घर पाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी केलेली मोठी कारवाई समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठी मोहीम सुरू केली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिस त्रालमधील दहशतवादी आसिफच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी त्याच्या घरात स्फोटकांचा साठा होता, ज्यामुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुलडोझर वापरून दहशतवादी आदिलच्या घरावर कारवाई केली ते घर जमीनदोस्त केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये दहशवादी सुरक्षा दलांना आव्हान देताना दिसत होते.
आसिफ शेख आणि आदिल हे दोघेही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहेत. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. २२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओमध्ये हे दोघेही दिसत होते. या भयानक हल्ल्यानंतर दोघेही फरार आहेत. हल्ल्यात सहभागी असलेल्या आसिफ आणि आदिलसह इतर दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे.