देश - विदेश
ब्रेकिंग! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार

- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारत देशात संताप धुमसत आहे. भारत सरकारनेही या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वात आधी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची कोंडी करणारे निर्णय घेतले आहेत. हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. याच दरम्यान अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडू लागल्या आहेत. यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरात एलओसीवर पाकिस्तानने रात्रभर गोळीबार केला. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानेही गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
- नियंत्रण रेषेवर असलेल्या पाकिस्तानी चौक्यांकडून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून अशा कुरापती याआधीही अनेकदा काढण्यात आल्या आहेत. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर या भागात तणाव वाढला आहे. भारतीय सैन्य अलर्ट मोडवर आहे. या घटनेनंतर लष्करप्रमुख तातडीने एलओसीकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.
- जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यात जोरदार चकमक सुरू झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना या परिसरात अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर कुलनार बाजीपूरा भागात सैन्याने नाकाबंदी केली आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. सैन्याची चाहूल लागताच लपून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. भारतीय जवानांनीही प्रत्युत्तरात गोळीबार सुरू केला.



