पहलगाममध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक पाऊले उचलली आहेत. पाकिस्तानवर राजकीय दबाव टाकत पाच मोठे निर्णय घेतले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. भारत सरकारने जे निर्णय घेतले आहेत, त्यामुळे पाकिस्तानची कोंडी होणार आहे. पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 27 जणांना आपला जीव गमवाला लागला होता.
भारताने पाकिस्तानवर राजकीय सर्जिकल स्ट्राईक केला आहे. त्यानुसार भारताने सिंधु पाणी कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे करारानुसार भारतातून पाकिस्तानला सोडले जाणारे पाणी आता रोखले जाणार आहे. त्याचा थेट फटका पाकिस्तानला बसणार आहे. या पाण्यावर पाकिस्तानची शेती अवलंबून आहे. कापड उद्योगालाही हेच पाणी मिळते. जर हे पाणी अडवले गेले तर पाकिस्तानची अवस्था वाईट होईल. या शिवाय अन्य चार मोठे निर्णय ही घेण्यात आले आहेत.
पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देण्यात येणार नाही. जे पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी दुतावासातील अधिकाऱ्यांनाही भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर अटारी वाघा बॉर्डर ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक मेपर्यंत ही बॉर्डर बंद राहील. जे भारतीय पाकिस्तानात आहेत त्यांनी भारतात यावे, असे आदेश ही देण्यात आले आहेत.