देश - विदेश

सुरक्षा दलाची काश्मीरमध्ये मोठी कारवाई!

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन विदेशी नागरिकांसह 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीसीएस बैठक पार पडली. मात्र, त्याआधीच सुरक्षा दल कारवाई करताना दिसत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या एका दिवसानंतर काश्मीरमधून तब्बल दीड हजार लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच दक्षिण काश्मीरमधून सुमारे 250 हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक सुरू असतानाच जम्मू आणि काश्मीरमधून लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली. 

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून सक्रिय कार्यकर्ते आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या रेकॉर्डवरील व ज्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आले आहेत अशा दीड हजार लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये ओव्हरग्राउंड वर्कर्स, माजी दहशतवादी आणि ज्यांच्याविरुद्ध आधीच एफआयआर दाखल झाले आहेत किंवा ज्यांची नावे गुप्तचर यंत्रणेच्या वॉच लिस्टमध्ये आहेत, अशा सर्वांचा समावेश आहे. तसेच हल्लेखोरांना आश्रय देणाऱ्यांचाही शोध तपास यंत्रणा घेत आहे. 

यासाठी संपूर्ण परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली जात आहेत. संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले जात आहे. राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर विशेष देखरेख ठेवली जात आहे.

Related Articles

Back to top button