‘जय हिंद…’ नववधूने शहीद पतीला दिली अखेरची मानवंदना

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मारलेल्या पर्यटकांमध्ये लेफ्टनंट विनय नरवाल यांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव मायदेशी आणण्यात आले. यावेळी भारतीय नौदलाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पत्नी हिमांशीने वीरगती प्राप्त केलेल्या आपल्या पतीला ‘जय हिंद!’ म्हणत अखेरचा निरोप दिला.
नौदलाचे लेफ्टनंट विनय हे पत्नी हिमांशीसोबत हनिमुनसाठी गेले होते. दोघांनी सहा दिवसांपूर्वी 16 एप्रिल रोजी मसुरी येथे डेस्टिनेशन वेडिंग केले. हिमांशी ही गुरुग्रामची रहिवासी आहे. लग्नाच्या स्वागत समारंभानंतर ते जम्मू काश्मीरला रवाना झाले होते. मात्र, काल दुपारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लेफ्टनंट विनय जखमी अवस्थेत पडलेले दिसत आहेत, तर जवळ बसलेली हिमांशी रडत आहे. फोटो पाहून लोक भावनिक झाले. त्यानंतर आता पुन्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडिओमध्ये हिंमाशी आपल्या वीरगती प्राप्त केलेल्या पतीच्या मृतदेहासमोर टाहो फोडताना दिसत आहे. नौदलाने लेफ्टनंट विनय यांना मानवंदना दिली.
यावेळी हिमांशीने पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली. आय एम प्राऊड ऑफ यू विनय इव्हरीटाईम जय हिंद…, असे म्हणत तिने टाहो फोडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.