देश - विदेश
नितीन गडकरींचा अनोखा प्लॅन

- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलिकडे नवी माहिती दिली आहे. नंबर प्लेटनंतर आता तुमच्या गाडीचा हॉर्न बदलणार आहे. यापुढे कार किंवा दुचाकीचा हॉर्न वाजवला की बासरी, तबला, हार्मोनियम किंवा व्हायोलिनसारखा भारतीय वाद्यांचा आवाज ऐकू येईल. होय, केंद्र सरकार अशा कायद्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे वाहनांचे हॉर्न अधिक आनंददायी आणि भारतीय संस्कृतीशी सुसंगत असतील. ही माहिती गडकरी यांनी दिली असून ते एका वृत्तपत्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी सांगितले की, वाहनांचे हॉर्न पारंपरिक भारतीय वाद्यांवर आधारित असावेत, यासाठी कायदेशीर पावले उचलण्याचा विचार सरकार करत आहे.
- गडकरी म्हणाले की, देशातील वायू आणि ध्वनी प्रदूषणात वाहतूक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. हॉर्नचा आवाज कमी करत त्याला सांस्कृतिक रूप देण्याचाही यात समावेश आहे. त्याचबरोबर ग्रीन फ्युएल वापरणाऱ्या वाहनांना सरकारचा प्रोत्साहन मिळत आहे, ज्यात इथेनॉल, मिथेनॉल आणि जैवइंधन यांचा समावेश आहे.
- हॉर्नचा आवाज फक्त इशारा देणारा नसावा, तर तो कर्णसुखद असावा. त्यामुळे वाहनांच्या आवाजामुळे होणारा मानसिक त्रास आणि ध्वनी प्रदूषण कमी होईल, असा सरकारचा विश्वास आहे. यामुळे भारतातील वाहतूक अनुभव अधिक सुखकर होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.