ब्रेकिंग! एकनाथ शिंदे यांचे मध्यरात्री ट्विट

महायुतीने विधानसभेचा निकालात स्पष्ट बहुमत मिळवले. आता मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते मुख्यमंत्री पद आपल्याच पक्षाला मिळावे, यासाठी आग्रही आहेत. शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेनेचे नेते मैदानात उतरले असून प्रसारमाध्यमांसमोर तशा प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री स्वतःहून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनिक आवाहन केले आहे.
२६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आलेल्या १४ व्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होऊन शपथविधी होणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजपने निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या. त्यामुळे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी भाजपकडून दबाव सुरू आहे. तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि कार्यकर्तेही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.
एकनाथ शिंदे मध्यरात्री यांनी काय पोस्ट केली? – महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र, अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील.