नाशिकच्या पराभवाचे विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झाले, असे म्हणत ठाकरे गट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकचा पराभव का झाला? यावर बोलताना जोरदार हल्लाबोल केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्यावर भाष्य करत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
तुलसी गबार्ड. नाव लक्षात ठेवा. ही साधी बाई नाही. मोदीची बहीण आहे. मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात. मोदी आता अमेरिकेत गेले होते. तेव्हा गंगाजल घेऊन गेले होते.
तुलसी गबार्डला गंगाजल दिले. ही बाई साधी नाही. ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागात आहे. तिने सांगितले परवा. ईव्हीएम हायजॅक होते. ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात, असे राऊत यांनी म्हटले. तर ईव्हीएम हायजॅक होते, हे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखाने आणि मोदीच्या बहिणीने सांगितले. तिच्या हातात गंगाजल आहे ती खोटं बोलणार नाही, असे म्हणत राऊत यांनी जोरदार घणाघात केला.