चित्रपटसृष्टी कोणतीही असो, ड्रग्जशी संबंधित प्रकरणे वेळोवेळी समोर येतच असतात. यावेळी मल्याळम अभिनेत्री विंसी अलोशियस हिने एक धक्कादायक खुलासा करत ड्रग्ज सेवन करणाऱ्या कलाकारांविषयी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. तिने स्पष्ट केले की अशा व्यक्तींसोबत ती कधीच काम करणार नाही.
केरळमधील पल्लीपुरम चर्चमध्ये आयोजित केसीवायएम एर्नाकुलम-अंगमाली मेजर आर्चडायोसीजच्या 67 व्या कार्यकारी वर्षात विंसीने आपली मते मांडली. ती म्हणाली, जर मला एखाद्याच्या ड्रग्ज सेवनाबद्दल समजले, तर मी त्याच्यासोबत चित्रपटात काम करणार नाही. यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली.
यानंतर विंसीने तिच्या वैयक्तिक अनुभवाचा व्हिडीओ शेअर करत एका चित्रपटातील प्रसंग उलगडून सांगितला. संबंधित अभिनेता ड्रग्जच्या नशेत तिच्याशी असभ्य वागला होता. ड्रेसमध्ये अडचण असल्यावर त्या अभिनेत्याने सर्वांसमोर मी तुला तयार व्हायला मदत करतो, असे म्हटले होते. या वक्तव्यानंतर संपूर्ण सेटवर अस्वस्थ वातावरण निर्माण झाले होते.
विंसी पुढे म्हणाली, एका सीनच्या रिहर्सलदरम्यान त्या अभिनेत्याच्या तोंडातून पांढऱ्या रंगाचा पदार्थ टेबलावर पडला. त्यामुळे तो सेटवर ड्रग्ज घेतोय हे स्पष्ट झाले. त्याच्या अशा वागण्यामुळे इतर कलाकार आणि सेटवरील टीमसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.