देश - विदेश

ब्रेकिंग! राज्यसभेत ठोकण्याची भाषा; नड्डांचा आक्रमक पवित्रा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधकांकडून राज्यसभेत ठोकण्याची भाषा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले. कामकाज सुरूळीत सुरू असताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. प्रामुख्याने सभागृह नेते जे. पी. नड्डा यांना आक्रमक पवित्रा घेतला.

राज्यसभेत खर्गे यांना बोलण्याची इच्छा होती. पण उपसभापतींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. सकाळीच ते बोलले असल्याचे त्यांनी सांगितले. उपसभापती हरिवंश हे काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह यांना बोलण्यासाठी संधी देणार होते. पण यादरम्यान खर्गे चांगलेच संतापले. खर्गे यांनी बोलण्यास सुरूवात केली.

उपसभापतींनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर खर्गे यांनी डेक्टेटरशिपचा आरोप केला. उपसभापतींकडे पाहत ते म्हणाले, मला बोलायचे आहे. आम्ही बोलण्यासाठी तयार आहोत आणि तुम्हाला कसे ठोकायचे, आम्ही व्यवस्थित ठोकू. खर्गे यांच्या या विधानावर उपसभापतींनीही आक्षेप घेतला. तसेच सत्ताधारी सदस्यांनीही विरोध करण्यास सुरूवात केली.

वादंग निर्माण झाल्यानंतर खर्गेंनी बॅकफूटवर येत सरकारला ठोकणार, तुम्हाला नाही, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नड्डा यांनी आक्रमक पवित्रा घेत खर्गे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. विरोधी पक्षांनी अशाप्रकारच्या भाषेचा उपयोग करणे खूप वाईट आहे. ते अनुभवी आहेत अनेक वर्षे संसदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. पण सभापतींविषयी त्यांचे विधान निंदनीय आहे. त्यांनी माफी मागायला हवी, असे नड्डा म्हणाले.

नड्डा यांच्यानंतर खर्गे यांनी पुन्हा बोलण्यास सुरूवात केली. तसेच त्यांनी उपसभापतींची माफी मागितली. मी तुम्हाला बोललो नाही सरकारला ठोकणार, असे बोलल्याचे सांगत खर्गेंनी त्यांची माफी मागितली.

Related Articles

Back to top button