बिजनेस

‘या’ वाहनांच्या किंमती वाढणार

राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजितदादा यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. राज्यात सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर चारचाकी सीएनजी आणि एलपीजी वाहनांवर वाहन प्रकार आणि किंमतींचा विचार करून 7 ते 9 टक्के दराने मोटार वाहन कर आकारला जातो.

या कराच्या दरात आता एक टक्का वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे चालू वर्षात राज्य सरकारला दीडशे कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. अजितदादा म्हणाले, 30 लाखांपेक्षा जास्त किंमती ज्या वाहनांच्या आहेत, अशा वाहनांवर सहा टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित आहे. तसेच या कराच्या कमाल मर्यादेत 20 लाखांहून 30 लाखांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहन कराच्या मर्यादेत वाढ करण्याच्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न जमा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे जवळपास 170 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल, अशी शक्यता आहे.

क्रेन, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एक्सॅव्हेटर्स या बांधकाम क्षेत्रातील वाहनांना एक रकमी वाहन किंमतीच्या सात टक्के दराने कर आकारण्यात येणार आहे. यामुळे देखील 180 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी शक्यता आहे.

या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रातील वाहनांच्या किंमती वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. साडेसात हजार किलो वजनापर्यंतच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर सात टक्के मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित आहे. या वाढीव कराच्या माध्यमातून 625 कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला मिळू शकतो, असे अजितदादा म्हणाले.

Related Articles

Back to top button