पाणी उकळून अन् अन्न पूर्ण शिजवून खा; अन्यथा…

राज्यात गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या नव्या गुंतागुंतीच्या आजारामुळे भीतीची लाट आहे. दूषित पाणी व शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. शिळे अन्न टाळून पूर्ण शिजलेले अन्न खाल्ल्यास आणि पाणी उकळून पिल्यास या आजाराचा धोका होत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
हा आजार संसर्गजन्य नसून तो जंतू संसर्गाच्या घटनेनंतर संसर्गोत्तर (पोस्ट इन्फेक्शन) गुंतागुंतीचा आजार मानला जातो. एकदम अधिक संख्येने या आजाराच्या नोंदी आढळल्या असल्या तरी हा आजार संसर्गजन्य नाही. एखादा जंतू संसर्ग झाल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरातील मज्जासंस्थेवर हल्ला करते.
परिणामी नसांना नियमित कार्य करता येत नाहीत. त्यामुळे मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांचे कार्य कमी होते.
दरम्यान, सुरवातीला या आजाराची कारणे शोधली गेली तेव्हा त्यात दूषित पाणी हे त्याचे कारण समोर आले होते. सहसा अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरु शकतात. वेळीच उपचार केल्यास त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. तसेच वेळेत उपचार केल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे.