क्राईम
प्रेयसी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याचे समजताच रचला प्लॅन

- राज्यात एक संतापजनक घटना घडली आहे. २२ वर्षीय तरुणीचे तिच्या एक्स बॉयफ्रेंडने पाच मित्रांच्या मदतीने अपहरण केले आणि त्यानंतर चार जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना भिवंडीतील शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत केवळ एकाच आरोपीला अटक झाली आहे. उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि मुख्य आरोपी (एक्स बॉयफ्रेंड) हे दोघेही एका गावातील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, चार महिन्यांपूर्वी दोघांमध्ये ब्रेकअप झाला. पीडितेने दुसऱ्या व्यक्तीसोबत नवीन नाते जोडल्याचे समजताच तिच्या एक्स बॉयफ्रेंडला हे सहन झाले नाही. संतापाच्या भरात त्याने आपल्या पाच मित्रांच्या मदतीने तिच्याशी सूड घेण्याचा कट रचला.
- गुरुवारी रात्री मुख्य आरोपी असलेल्या असीम (नाव बदलले आहे) याने पीडित तरुणीच्या भावाला ओलीस धरले आणि त्याच्यावर दबाव टाकून त्याच्या बहिणीला एका ठिकाणी बोलावण्यास भाग पाडले. पीडित तरुणी झोपेत असताना तिला आपल्या भावाकडून १५ मिस्ड कॉल्स आल्याचे दिसले. रात्री १:१५ वाजता तिने फोन उचलला असता भावाने ताप असल्याचे सांगून तिला एका ठिकाणी येण्यास सांगितले.
- ही तरुणी तातडीने रिक्षाने त्या ठिकाणी पोहोचली. मात्र, तिथे तिच्या भावासह तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याचे पाच मित्र आधीच थांबले होते. त्यांनी तिच्या भावाला आणि रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. यानंतर जबरदस्तीने तरुणीला रिक्षात बसवून आरोपींनी तिला एका शाळेच्या मागील जंगलात नेले. तिथे चार आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. त्यावरच न थांबता, आरोपींनी तिला दुसऱ्या एका ठिकाणी नेऊन एका पिकअप व्हॅनमध्ये पुन्हा तिच्यावर अत्याचार केले.
- दरम्यान या प्रकरणात शांतिनगर पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उर्वरित पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.