आईला गळा दाबून मारण्यात आले, त्यानंतर तिला पंख्याला लटकवण्यात आले. चार वर्षांच्या चिमुरडीने चित्र काढून घडलेला हा सगळा प्रकार सांगितला. चित्रामध्ये आईचा गळा दाबणारा तो माणूस कोण आहे? हे विचारल्यानंतर चिमुरडीने जे उत्तर दिले ते ऐकून तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. चार वर्षांच्या मुलीसमोरच तिचे वडील आईची हत्या करत होते. हत्या केल्यानंतर वडिलांनी मृतदेहाच्या गळ्याला दोर लावला आणि दोराच्या सहाय्याने मृतदेह छतावरच्या पंख्याला लटकवला. मुलीने आपले वडीलच आईची हत्या करत असल्याचे स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले, पण घाबरल्यामुळे तेव्हा ती काहीही बोलली नाही. यानंतर पोलीस घरी आले. मुलीच्या वडिलांनी आपल्या पत्नीने स्वत:हून जीवन संपवल्याचा जबाब पोलिसांना दिला, पण या चार वर्षांच्या मुलीने एक चित्र काढले, ज्यामुळे या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला आहे.
या मुलीच्या वडिलांचे नाव संदीप बुधौलिया आहे. संदीप एका औषधाच्या कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह आहे. 27 फेब्रुवारी 2019 ला सोनाली आणि संदीपचे लग्न झाले. सोनाली मध्य प्रदेशच्या टीकमगढ जिल्ह्याची रहिवासी होती. लग्नामध्ये सोनालीच्या वडिलांनी संदीपला 20 लाख रुपये हुंडा म्हणून दिला होता. पण संदीपला हुंड्यासोबत गाडीही पाहिजे होती. गाडी मिळाली नाही म्हणून सोनालीवर सासरी अत्याचार केले गेले. तीन वर्ष हे अत्याचार सुरू राहिले, यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला.
14 फेब्रुवारीला मामाच्या मुलाचे लग्न असल्यामुळे सोनाली मुलीसोबत 12 फेब्रुवारीलाच घरातून गेली. लग्नाच्या एक दिवसानंतर संदीपने सोनालीला फोन केला आणि आज घरी आली नाहीस तर परत कधीही येऊ नकोस, अशी धमकी दिली. यानंतर सोनाली 16 फेब्रुवारीला घरी आली. यानंतर 17 फेब्रुवारीला सकाळी संदीपने सोनालीच्या माहेरी फोन करून तिने जीवन संपवले असल्याचे सांगितले.
मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच सोनालीचे आई-वडील झांसीला आले. रोजच्या भांडणाला कंटाळून सोनालीने जीवन संपवल्याचे तिच्या आई-वडिलांना सांगण्यात आले. संदीपने पोलिसांनाही हेच सांगितले. पण तेव्हाच चार वर्षांच्या नातीने आजी-आजोबांना चित्राच्या माध्यमातून सगळं सत्य सांगितले. हे चित्र पाहून आजी-आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी लगेचच पोलिसांना याची माहिती दिली.
मुलीने चित्राच्या माध्यमातून सगळं सांगितलं तोपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला होता. सोनालीचा मृत्यू गळफास लागल्याने झाल्याचे रिपोर्टमध्ये लिहिले होते, पण त्याचसोबत मृत्यूआधी सोनालीला ऍन्टीमॉर्टम जखमा झाल्याचेही रिपोर्टमध्ये लिहिण्यात आले होते. ऍन्टीमॉर्टम जखमा म्हणजे जिवंत असताना व्यक्तीवर अत्याचार केले जातात.
चित्र पाहिल्यानंतर पोलिसांनी मुलीचीही चौकशी केली. मुलीने काढलेले ते चित्र पोलिसांना दाखवले. पोलिसांनीही मुलीला विश्वासात घेऊन या चित्राचा अर्थ विचारला. तसेच चित्रातला तिसरा हात कुणाचा आहे? असा प्रश्न पोलिसांनी मुलीला विचारला. यानंतर मुलीने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी संदीपला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.