शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंकडून मला CM पदाची ऑफर

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत फूट पडली. या बंडानंर मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती. तुम्ही मुख्यमंत्री बना असा फोन उद्धव ठाकरेंनी केला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला.
शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव यांनी मला फोन केला होता. तुम्ही मुख्यमंत्री बना, असे सांगत त्यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आम्ही ज्यावेळी शिंदे यांच्यासोबत आहोत, हे स्पष्ट झाले. त्यानंतर मला उद्धव यांचा फोन आला होता. त्यांनी मला त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती.
तुम्ही त्यांना कशाला सोबत घेता किंवा एखादे पद देता. त्यापेक्षा मीच सगळा पक्ष घेऊन येतो. तुम्ही मुख्यमंत्री बना. सगळं नीट होईल असे उद्धव .म्हणाले. पण, मी त्यांना म्हणालो, आता वेळ निघून गेली आहे. माझ्या पातळीवर हा विषय संपला आहे. हवे तर तुम्ही वरिष्ठांशी चर्चा करू शकता, असे मी म्हणालो. पुढे त्यांनी आमच्या वरिष्ठांशी चर्चा केली की नाही याची कल्पना मला नाही. हा फोन मिलिंद नार्वेकर यांनी लावून दिला होता. त्यानंतर उद्धव माझ्याशी बोलले, असे फडणवीस म्हणाले.