बिजनेस
ब्रेकिंग! तुमचे पॅन कार्ड बदलणार, सध्याचे कार्ड बाद होणार?
- केंद्रीय मंत्रिमंडळाने पॅन कार्ड अद्ययावत करण्याच्या पॅन २.० प्रकल्पाला काल मंजुरी दिली. त्यामुळे नवे पॅन कार्ड आता क्यूआर कोडसह दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे सध्या जुने कार्ड आहे, त्यांना क्यूआर कोड असलेले नवे पॅनकार्ड कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नव्या पॅनकार्डसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल का? जुन्या कार्डचे काय होणार या सर्व प्रश्नाची उत्तरे घेऊ यात.
- केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या प्रकल्पाची माहिती संसदेत दिली. पॅन क्रमांक बदलण्याची गरज नाही, असे वैष्णव म्हणाले. या प्रकल्पावर १४३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेनुसार सर्वांना नवे पॅन कार्ड दिले जाणार आहे. सध्याच्या पॅनकार्ड धारकांना त्यांचे पॅन कार्ड बदलण्याची किंवा नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही.
- वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, नवीन कार्डमध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत पॅन २.० प्रकल्प सक्षम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे सरकारी यंत्रणांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅन एक कॉमन आयडेंटिफायर म्हणून यापुढे पात्र ठरणार आहे.
- पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावी लागतील का, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. यावर अश्विनी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पॅन अपग्रेडेशन विनामूल्य केले जाणार आहे. तसेच ते घरपोच देण्यात येणार आहे. वैष्णव पुढे म्हणाले, आतापर्यंत पॅनकार्ड ऑपरेट करणारे सॉफ्टवेअर १५ ते २० वर्षे जुने असल्याने यात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. नव्या प्रणालीअंतर्गत पॅनकार्डशी संबंधित सर्व यंत्रणा डिजिटल पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत, जेणेकरून तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यात येईल.