क्राईम
चोराला महिलांचा शौक, अभिनेत्रीला दिले तीन कोटींचे घर

- गेल्या वीस वर्षांत अनेक ठिकाणी चोरी केलेल्या अट्टल चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बंगळुरू पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा आरोपी सोलापूर जिल्ह्यातील आहे. बंगळुरू पोलिसांनी केलेल्या कारवाईत मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या 37 वर्षांच्या चोराला पकडण्यात यश आले आहे. पंचाक्षरी एस. स्वामी असे या चोराचे नाव आहे. त्याला 4 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्याला पकडण्यात आल्याच्या वृत्ताला पोलीस आयुक्त बी. दयानंदा यांनी दुजोरा दिला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामीने 2003 सालापासून चोरीचे प्रकार सुरू केले. त्यावेळी तो अल्पवयीन होता. 2009 सालापर्यंत त्याने चोरीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केली. 2014-15 साली तो एका अभिनेत्रीसह रिलेशनशिपमध्ये होता. तिच्यावर त्याने खूप पैसे खर्च केले. कोलकात्यात तिच्यासाठी तीन कोटी रुपयांचे घर खरेदी केले.
- गुजरात पोलिसांनी 2016 साली या आरोपीला अटक केली होती. तरीही तो सुधारला नाही. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तो पुन्हा चोरी करू लागला. 2024 साली तो बंगळुरूत आला. तिथेही त्याने चोरीचे हे उद्योग सुरूच ठेवले. या चोराचे वैशिष्ट्य असे, की तो खासकरून रिकाम्या घरांवर लक्ष ठेवून असायचा आणि शक्यतो अशा घरांमध्येच चोरी करायचा.
- 9 जानेवारी 2025 रोजी बंगळुरूतील मारुती नगरमधल्या एका घरातून या चोराने 14 लाख रुपये मूल्याचे सोनं आणि चांदीचे दागिने चोरल्याचा आरोप ठेवून त्याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना त्या आरोपीची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली आहे.