खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, सगळ्यांनाच ठोकणार

भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्ह्यातील खोक्या भाई उर्फ सतीश भोसले याला आणखी एक दणका बसला आहे. खोक्या भाईच्या घरावर थेट बुलडोझरच चालवण्यात आला आहे. वनविभागाने ही मोठी कारवाई केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक इशारा दिला आहे.
फडणवीस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत फडणवीस यांनी मोदी यांचे आभार मानले. त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना खोक्या भाई उर्फ सतीश भोसले याच्यावरील कारवाईवरून प्रश्न विचारला असता त्यांनी कडक इशारा दिला.
फडणवीस म्हणाले की, मी दिल्लीमध्ये वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो आहे. पण तरी यावर उत्तर देतो की, खोक्या असो, बोक्या असो, कुणालाही सोडणार नाही. सगळ्यांना ठोकणार आहे. खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कुणालाच सोडणार नाही, सर्वांनाच ठोकून काढणार, असे फडणवीसांनी सांगितले.
ज्यावेळी खोक्याला अटक झाली, त्यावेळी खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे, असे ट्वीट अजय मुंडे यांनी केले होते. अजय मुंडे हे धनंजय मुंडे यांचे बंधू आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मात्र कुणालाच सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.