राजकीय
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार?
- राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांत अस्वस्थता वाढली आहे. नेते मंडळी पक्ष सोडून चालली आहेत. ठाकरे गटाला सर्वाधिक गळती लागली आहे. यातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटच नाही तर काँग्रेसलाही खिंडार पाडण्यात येणार असल्याचा दावा केला होता. दुसरीकडे ठाकरे गटातून संमिश्र प्रतिक्रिया आल्याने गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. यानंतर या सगळ्या घडामोडींवर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ठाकरे गट फुटेल असे मला वाटत नाही, असे पवार म्हणाले.
- पवार यांनी आज सकाळी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तसेच सामंत यांच्यावर निशाणा साधला. उद्योगमंत्री सामंत दावोसला गुंतवणुकीसाठी गेले होते की पक्ष फोडण्यासाठी गेले होते, अशी जोरदार कोपरखळी पवार यांनी मारली.
- स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल दोन गटांचे मेळावे झाले. बीकेसीमध्ये शिंदेसेनेचा तर अंधेरीत ठाकरे गटाचा मेळावा झाला. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला तुलनेने जास्त गर्दी होती. ठाकरे गटातील नेते कार्यकर्ते, पदाधिकारी जे बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत ते आता शिंदे गटात जातील, असे मला वाटत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत ठाकरे स्वतंत्र लढण्याच्या विचारात असतील तर त्याविषयी महाविकास आघाडीत सामंजस्याने विचार करण्यात येईल, असे पवार म्हणाले.