गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दरीत पडून पुण्यातील एका महिला पर्यटक आणि पायलटचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल सायंकाळी पाचच्या सुमारास केरी गावात ही दुर्घटना घडली. केरी येथील डोंगराळ भागात झालेल्या अपघातात पुण्यातील शिवानी दाभाळे (वय २६) आणि पायलट सुमल नेपाळी (वय २६) यांचा मृत्यू झाला. गोव्याच्या उत्तर भागात ही दुर्घटना घडली.
गोव्याला फिरण्यासाठी पुण्याहून आलेला पर्यटकांचा एक ग्रुप काल सायंकाळी केरी येथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी आला होता. येथील ज्या डोंगरावरुन पैराग्लाइडिंग केले जाते, त्या ठिकाणी हा ग्रुप पोहोचला. यावेळी शिवानी हिने पायलट सुमल याच्यासह डोंगरावरून उड्डाण केले. थोड्यावेळातच त्यांचे पैराग्लायडर दरीत कोसळले आणि यात दोघांचा मृत्यू झाला. ग्लायडरची दोरी तुटल्याने ते कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मांद्रे पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान शिवानी यांनी ज्या साहसी क्रीडा कंपनीकडून पॅराग्लायडिंगसाठी बुकिंग केले होते, ती कंपनी बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उड्डाण करताच पॅराग्लायडर दरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कंपनीचे मालक शेखर रायजादा यांच्याविरोधात मांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्याची कोठडीत चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.