प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम!

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये घडली. अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला. संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बाक्कर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
गिम्हवणे गावात निलेश बाक्कर यांचा सलूनचा व्यवसाय होता. मात्र, ते सोमवारीपासून बेपत्ता होते. त्यामुळे निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आली.
नेहा ज्या हॉटेलमध्ये कामाला होती, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता ते दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. एका बियर शॉपीमधून नेहाने बियर घेतल्याचेसुद्धा सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. आपल्याच पतीला प्रियकराच्या मदतीने दारू पाजून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर हा मृतदेह विहिरीत फेकला.