चुका माझ्याकडूनही होतात, मी माणूस आहे, देव नाही

Admin
1 Min Read

झिरोधा या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्या पॉडकास्ट मालिकेतील पुढचे पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. या पॉडकास्टच्या नव्या ट्रेलरमधून याचा खुलासा झाला आहे. त्यामुळे मोदी पहिल्यांदाच पॉडकास्टसारख्या माध्यमातून सर्वांसमोर येणार आहेत.

काल निखिल यांनी एक टीझर प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये निखिल पॉडकास्टवर आलेल्या एका पाहुण्याबरोबर बोलत असल्याचे दाखवले होते. मात्र, त्यामध्ये पाहुणे कोण आहे, हे दाखवले नव्हते. असे असले तरी टीझरमधील आवजावरून हे पाहुणे मोदी असल्याचा अंदाज अनेकांनी लावला होता. आता निखिल यांनी पॉडकास्टवरील पुढील पाहुणे मोदी असल्याचा खुलासा करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

 मोदींचा निखिल यांच्याबरोबरचा पॉडकास्ट केव्हा प्रसिद्ध होणार याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, निखिल यांच्या पॉडकास्टच्या या भागाचे नाव पीपल विथ द प्राईम मिनिस्टर असे आहे. दरम्यान, या पॉडकास्टमध्ये सुरुवातीलाच मी पहिल्यांदाच पॉडकास्टमध्ये सहभागी होत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटल्याचे ऐकू येत आहे. यावेळी मोदींनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दिलेल्या भाषणाचाही उल्लेख केला. चुका अपरिहार्य आहेत. मीही चुका केल्या असतील. मी एक माणूस आहे, देव नाही, असे ते म्हणाले.

यावेळी राजकारणात येण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यांनी एक सल्लाही दिला. लोकांनी महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे. चांगल्या लोकांनी राजकारणात येत राहिले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

Share This Article