नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळू शकणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे. याअंतर्गत अपघातग्रस्तांच्या सात दिवसांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे.
अपघातानंतर २४ तासांच्या आत पोलिसांना ही माहिती दिल्यास उपचाराचा खर्च सरकार उचलेल, असे गडकरी यांनी सांगितले. यामुळे रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांना मोठी मदत होणार आहे.
गडकरी म्हणाले की, काही राज्यांमध्ये कॅशलेस उपचार हा पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरु करण्यात आला होता. आता त्यातील सर्व त्रुटी दूर करून त्याची पुन्हा अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचा फायदा पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. तर हिट अँड रन प्रकरणात एखाद्याचा मृत्यू झाल्यास सरकार दोन लाख रुपये देईल. दिल्लीत गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर गडकरी यांनी यांसदर्भात माहिती दिली.